मुंबई : सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणणाऱ्या पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाची अपेक्षा केली जाते. दुर्जनांचा नाश करण्यासाठी पोलीस पुढे येऊन नागरिकांना धीर देतील, आधार देतील असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, अनेकदा पोलिसांकडूनच सर्वसामान्यांवर अन्याय केला जातो, अत्याचार केला जात असल्याचं पाहायला मिळतं. आता, बारामतीतूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून दोन पोलिसांनी महिलेवर अत्याचार केल्याची प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांच्या बँड्स पथकात दाखल करुन घेण्याचं आमिष दाखवत पीडितेवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार आणि बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे यांच्यावर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत असून दुसरा आरोपी मारुती करे हा मुंबई बँड पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल
पोलिस दलातील आरोपींनी पीडितेचा विश्वास संपादन करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संबंधित पीडीतेने पोलिसात धाव घेतली होती. मात्र, त्या ठिकाणी दाद न मिळाल्याने संबंधित पीडिता न्यायालयात गेली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय. गंभीर गुन्हा असताना पोलीस प्रशासन आरोपींना अटक करीत नसल्याचा आरोप करीत पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात न घेतल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार असल्याचेही पीडितेने सांगितलं.